जळगाव (प्रतिनिधी) दूध संघातील अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह यांच्यासह हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील आणि अनिल हरिशंकर अग्रवाल यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पाचवा संशयित आरोपी रवी मदनलाल अग्रवाल (रा. अकोला) याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, शैलेश मोरखडे यांच्या फिर्यादीतून तुपाचा झोल नेमका कसा झाला?, हे समोर आले आहे.
29 ऑगस्टच्या प्रशासकीय मिटिंगमध्ये फुटले बिंग !
फिर्यादी शैलेश मोरखडे यांचा पुरवणी जबाब आणि साक्षीदारांच्या जबाबावरून १२० ब सह इतर कलमं पोलिसांनी वाढवली आहेत. त्यामुळे एममडी मनोज लिमयेंसह इतरांवर कारवाईचा फास आवळला जाणार असल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासातून समोर येत आहे. दुसरीकडे फिर्यादीत सविस्तर जळगाव दुध संघात तुपाचा अपहार नेमका कसा झालाय हे सविस्तर नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार एमडी मनोज लिमये हे रजेवर असल्याने मोरखडे यांच्याकडे दूध फेडरेशनचा अतीरीक्त कार्यभार हा 3 ऑगस्ट 2022 पासून आला होता. दि. 29 ऑगस्ट रोजी दूध फेडरेशनची प्रशासकीय मिटिंग होती. या मिटिंगमध्ये तूप विक्री विभागाचे अधिकारी अंनत ए अंबीकर यांनी मिटिंगमध्ये त्यांना त्याच्या विभागात बी ग्रेड तुपाचा साठा शिल्लक नसल्याचे समजले. त्यांनी तसे मिटिंगमध्ये सांगितले की, आपल्याकडे असलेले 1800 किलो बी ग्रेडचे तुप आमच्या विभागात काम करणारे ठेका कर्मचारी निखील सुरेश नेहते व त्यांच्या सोबत काम करणारे कामगार हे मिळून प्रशासक समितीची कोणतीही पूर्व परवानगी न घेता श्री ग्रेडचे तूप हे बिल न करता विठ्ठल रुख्मीणी एजन्सी (जळगाव) यांना दि. 1 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2022 या दरम्यानच्या कालावधीमध्ये टप्या टप्याने विक्री केल्याचे तपासणीत समजले आहे. धक्कादायक म्हणजे बी ग्रेडचे तूप हे विक्री न करण्याचे आदेश होते.
प्रशासक समितीची पूर्व परवानगी न घेता विक्री
तुप विक्रीसाठी दुध संघाने निविदा मागवली होती. त्यासाठी दुध संघाने दि. 26 ऑगस्ट रोजी एका वृत्तपत्रात जाहीरात दिली होती. सदरचे तूप दुध संघ टेंडर पध्दतीने विक्री करणार होता. तुप विक्रीतून दूध फेडरेशनला 85 रुपये प्रती किलोचा दर प्राप्त झाला होता. निविदा मागवून दुध संघाला जास्तीत जास्त दर मिळण्याची अपेक्षा होती. सदर ठेका कर्मचारी निखील मेहते व त्यांच्या सोबत असलेले कर्मचारी यांनी सदर बी ग्रेडचे तूप हे विठ्ठल रुख्मिणी एजन्सीला 85 रुपये प्रति किलो दराने प्रशासक समितीची पूर्व परवानगी न घेता विक्री केले. वास्तविक बघता 1800 किलो तुप विक्रीतून दूध फेडरेशनला निविदा पध्दतीने 200 रुपये प्रती किलो पेक्षा जास्त दर मिळणार होता. यामुळे दूध फेडरेशनचे आर्थिक नुकसान झाले आहे. धक्कादायक म्हणजे निखील नेहते व त्यांच्या सोबतचे कर्मचारी यांनी ए ग्रेडचे तूप देखील बी ग्रेडचे असल्याचे भासवुन 525 रुपये प्रती किलोने हा माल देखील 85 रुपये किलोने विकला असल्याचा संशय आहे.
दुध संघाचे २ लाखांहून अधिकचे नुकसान
दि. 1 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2022 च्या दरम्यान निखील नेहते व त्यांच्या सोबत असलेल्या कर्मचारींनी जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मालकीचे 1800 किलो तुप हे 85/- रुपये दराने प्रशासक समीतीची पुर्व परवानगी न घेता विठठल रुख्मीनी एजन्सीला 1 लाख 53 हजारमध्ये म्हणजेचा कमी कीमतीत विक्री करुन जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या प्रशासक समितीची फसवणुक करून दुध संघाचे अदांजे 2 लाख 7 हजार पेक्षा अधिकचे आर्थिक नुकसान केले असल्याचे देखील शैलेश मोरखडे यांच्या फिर्यादीतून समोर आले आहे. दरम्यान, एकूण दीड कोटी रुपयांचा लोणी आणि दूध पावडरचा अपहार झाल्याचं समोर आलं आहे.
बी ग्रेड तुपाचा चॉकलेटसाठी वापर
जिल्हा दूध संघातील बी ग्रेड तुपाचा चॉकलेट बनविण्यासाठी वापर झाल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. मंगळवारी शहर पोलिसांनी बी ग्रेड तुपाचा चॉकलेटमध्ये वापर करणाऱ्या व्यावसायिक रवी मदनलाल अग्रवाल याला अकोला येथून अटक केली आहे. १८०० किलो बी ग्रेड तूपाची निखिल नेहते यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी पूर्व परवानगी न घेता कमी दरात विक्री करून जिल्हा दूध संघाची फसवणूक केल्याप्रकरणी ऑगस्ट महिन्यात शैलेश मोरखडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.