जळगाव (प्रतिनिधी) विद्यापीठात मेस चालविणारे पंकज शालीग्राम शर्मा (वय ६०, रा. प्रेमनगर) यांना मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास खोटेनगर ते मानराजपार्कदरम्यान, उड्डाणपुलावर घडली. यावेळी मिटींग आटोपून जळगावात येत असलेल्या जिल्हा परिषदेचे सीईओ श्री. अंकीत यांना अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतू याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.
तालुक्यातील बांभोरी येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मेस चालविणारे पंकज शर्मा हे नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री काम आटोपून विना क्रमांकाच्या बुलेटने घराकडे निघाले. खोटे नगर उड्डाणपुलावरुन जात असतांना त्यांना मानराज पार्कजवळ मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या अपघातात पंकज शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी तेथून जात असलेले जि. प. सीईओ श्री. अंकीत यांनी शर्मा यांना सीआरपी देण्याचा प्रयत्न केला. मात्र जखमी प्रतिसाद देत नसल्याने सीईओ श्री. अंकीत यांनी लागलीच रुग्णवाहिका बोलावून घेतली. त्यावेळी तेथून जात असलेल्या नागरिकांनी शर्मा यांची ओळख पटविली. त्यानंतर शर्मा यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
घरापासून काही अंतरावर घडली दुर्देवी घटना !
प्रेमनगरात राहणारे पंकज शर्मा हे मेस चालवून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. दररोज रात्री मेसचे काम आटोपून ते दुचाकीने घरी येत होते. नेहमीप्रमाणे घरी येत असतांना घरापासून अवघ्या काही अंतरावर त्यांच्यावर दुर्देवी काळाने झडप घातली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात मनहेलावणारा आक्रोश केला.
अन् जखमीच्या मदतीसाठी धावले जि. प. सीईओ !
अमळनेर येथून मिटींग आटोपून शहराकडे येत असलेले जिल्हा परिषदेचे सीईओ श्री. अंकीत यांना हा अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच आपले वाहन थांबवून जखमीच्या मदतीसाठी धावले. जखमीला मदत करण्यासाठी आलेले जि. प. सीईओ यांनी जखमीची पल्स तपासले. जखमी त्याला प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी शर्मा यांना सीआरपी देण्याचा प्रयत्न केला, परंतू तो प्रयत्न अयशस्वी ठरला.