पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव पोलीस शिपाई भरती परीक्षेचा आज लेखी पेपर होता. यात बांभोरी येथील नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेपर सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या परीक्षार्थी तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी कॉपी करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाऱ्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
या संदर्भात अधिक असे की, पोलिस शिपाई भरती २०१९ची प्रक्रीया सुरू झाली आहे. यात जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर १२८ पदांसाठी आज ९ ‘क्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता जळगाव व भुसावळ शहरातील ६८ केंद्रांवर २१ हजार ६९० उमेदवारांची १०० गुणांची बहुपर्यायी लेखी परिक्षा घेण्यात आली. बांभोरी येथील नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी महाविद्यालयात परीक्षा केंद्र होते. याठिकाणी योगेश रामदास आव्हाड (रा.पांझनदेव, पोस्ट.नागापूर जि.नांदगाव) या परीक्षार्थी तरुणाने परीक्षा केंद्रात नजर चुकवून मोबाईल आणला होता. योगेशने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका आपल्या एका मित्राला पाठवली. त्यानंतर त्याच्या मित्राने प्रश्नांची उत्तर सोडवून त्याला पाठवायला सुरुवात केली. हा प्रकार सपोनि देवरे यांच्या लक्षात आल्यानंतर योगेशला तात्काळ परीक्षाकेंद्राच्या बाहेर नेत चौकशी करण्यात आली. याप्रकरणी योगेश रामदास आव्हाड आणि त्याचा मित्र (नाव निषपन्न नाही) अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे कळते. दरम्यान, जळगाव तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरही कॉपी करणाऱ्या तरुणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचे कळते.
परिक्षा केंद्रावर मोबाईल, आक्षेपार्ह वस्तूंना होती बंदी
परिक्षा केंद्रावर पेन, पेन्सील, रबर, प्रवेशपत्र व शासकीय कामकाजासाठी ग्राह्य असलेले फोटोचे “ळखपत्र ऐवढ्याच वस्तु उमेदवारांनी आणने अपेक्षित होते. मोबाईल, आक्षेपार्ह वस्तुंना बंदी घालण्यात आली होती. या वस्तु आणल्यास उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येणार होते.