नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनावर जगात कुठंही औषधं यावं ही इच्छा आहे. आपले शास्त्रज्ञ देखील यावर प्रयत्न करत आहेत. परंतू जो पर्यंत औषध येत नाही, तो पर्यंत कोणताही निष्काळजीपणा करु नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशन सुरु होण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अधिवेशनाच्या आयोजनाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, खासदारांनी कर्तव्याचा मार्ग अवलंबला आहे. मी सर्व खासदारांचं आभार मानतो. याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेआधी आटोपावे लागले होते. यावेळी अधिवेशनात अनेक बदल केले आहेत. मात्र सर्वांनी याचे स्वागत केले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. विशिष्ट वातावरणात संसदेचे पावसाळी अधिवेशन होत आहे. कोरोना आहे आणि कर्तव्य सुद्धा बजावायचे आहे. खासदारांनी कर्तव्याचा मार्ग निवडला आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. यावेळी राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज वेगवेगळया वेळी होईल. शनिवार-रविवारी सुद्धा संसदेचे कामकाज होईल. सर्व खासदारांनी हे मान्य केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हिंमत, उत्साह आणि आत्मविश्वासासह आपल्या सेनेचे वीर जवान सीमेवर उभे आहेत. दुर्गम भागांत ते देशाच्या संरक्षणासाठी उभे आहेत. काही वेळातच वर्फाचा वर्षावही सुरू होईल. ज्या विश्वासासोबत ते उभे आहेत, सदनाचे सर्व सदस्य एक स्वर, एक भाव, एक भावना आणि एका संकल्पाने हा संदेश देतील, की देश सेनेच्या जवानांच्या मागे भक्कमपणे उभा आहे. संसद आणि संसदेतील सदस्यांच्या माध्यमातून देश उभा आहे. हाच मजबूत संदेश हे सदनदेखील देईल. सर्व माननीय सदस्यांच्या माध्यमातून देईल’ असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.