जळगाव (प्रतिनिधी) फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्या कारणाने महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा उपेक्षा आली आहे. फॉक्सकॉन प्रकल्पावरुन आमदार एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. राज्य सरकारने प्रतिष्ठा पणाला लावावी. हा राजकीय नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मीतेचा विषय आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येवून तो प्रकल्प महाराष्ट्रात राहण्यासाठी मोदी, शहा यांची भेट घेवून विनंती करावी, असे आवाहनही खडसे यांनी केले आहे.
एका कार्यक्रमानिमित्त एकनाथराव खडसे जळगाव येथे आलेले असताना त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. 20 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री मुक्ताईनगर मतदार संघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा दौरा, वेदांता प्रकल्प तसेच साधूंवर झालेल्या हल्ल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची खडसे यांनी उत्तरे दिली. वेदांता प्रकल्प गुजरातकडे वळवण्यात आला, हा महाराष्ट्रावर एकप्रकारे अन्याय आहे. हा निर्णय दुर्देवी असल्याचे ते म्हणाले.
या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत झाली असती. दरडोई उत्पन्नात 18 टक्क्यांनी वाढ झाली असती. राज्याचे जीडीपी वाढला असता. लाखो युवकांना रोजगार मिळाला असता. सर्व व्यवस्था अंतिम स्तराला आल्यानंतर हा प्रकल्प गुजरातकडे वळण्यात आला. हा राजकीय नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन अजूनही नरेंद्र मोदी, अमित शहा यांना भेटून हा प्रकल्प महाराष्ट्रात राहावा, यासाठी विनंती करावी. अजून वेळ गेलेली नाही. राज्य सरकारने प्रतिष्ठा पणाला लावावी. हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरु होण्यासाठी प्रयत्न करावेत. मुख्यमंत्र्यांनी हिंदू गर्जना केली. त्या माध्यमातून ते येत आहेत, स्थानिक आमदाराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येत आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. दौऱ्यामुळे जिल्हावासीयांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुक्ताईनगर व जिल्ह्यातील प्रकल्प मार्गी लागावेत,असेही खडसे यांनी म्हटले आहे.