मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाचा प्रादुर्भावही नियंत्रणात रहावा यासाठी गणेशोत्सवाप्रमानेच नवरात्रोत्सवासाठीही गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाच्या नवरात्रौत्सवात दांडिया किंवा गरब्याच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे.
असे आहेत नवरात्रोत्सवासाठीचे नियम
यंदाचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करणं अपेक्षित असल्यामुळं सार्वजनिक आणि घरगुती नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तीची सजावट तशीच असावी. कोरोनाची परिस्थिती पाहता न्यायालय, महापालिका आणि स्थानिक प्रशासनानं मंडपासाठी आखलेल्या नियमांचं पालन करणे अनिवार्य असेल. सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी महापालिका/ स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक राहील. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांसाठी देवीच्या मूर्तीची उंची मर्यादा ४ फूट, तर घरगुती मूर्तींसाठी ही मर्यादा २ फूट इतकी करण्यात आली आहे. शिवाय यंदाच्या नवरात्रौत्सवात दांडिया किंवा गरब्याच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच कोरोनासंदर्भात जनजागृती मोहीम राबवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.