जळगाव (प्रतिनिधी) रिपाेर्ट न पाहता निगेटिव्ह असल्याचे सांगून आपल्या आईला घरी पाठवल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुसुंबा येथील एकाने केला आहे.
या संदर्भात अधिक असे की, कुसुंबा येथील एका महिलेला ९ सप्टेंबर राेजी त्रास जाणवू लागल्याने ओम क्रिटिकल केअर या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनी टेस्ट करण्यासाठी शासकीय अायटीअाय येथील काेविड केअर सेंटर येथे जाण्यास सांगितले. त्यानंतर तेथे महिलेची केलेली अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली. ही महिला एकदिवस येथे थांबली. त्यानंतर तिला रुग्णवाहिनेने जिल्हा कोविड रूग्णालयात हलवण्यात अाले. त्या महिलेला दुसऱ्या दिवशी ११ सप्टेंबर रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. या वेळी ड्यूटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केसपेपरही न पाहता निगेटिव्ह असल्याचे सांगून त्यांना घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रुग्णाला घरी नेण्यात आले. परंतू साेमवारी १४ राेजी सकाळी महिलेला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याने त्यांना पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालात दाखल करण्यात आले. या महिलेवर उपचार सुरू असतांना सकाळी तिचा मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांनी भूमिका बदलवत ती महिला पॉझिटिव्ह असल्याचे आज मान्य केले. दरम्यान, डॉक्टर्सच्या बेपर्वाईने आईचा मृत्यू झाला असून या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माधव खरोटे यांनी केली आहे.