मुक्ताईनगर (प्रतिनिधी) भाजपविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. पण भाजपामध्ये माझ्यावर खूप अन्याय सुरू होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्तींनी माझ्यावर खूप अन्याय केला. भाजपतच राहिलो असतो तर मी राजकीय विजनवासात गेलो असतो. परंतू शरद पवारांमुळे मी पुन्हा राजकारणात आलो. मी यानिमित्ताने शरद पवारांचे आभार मानतो की त्यांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्यांनी जर प्रवेश दिला नसता तर माझे राजकीय जीवन थांबले असते, अशा शब्दात एकनाथराव खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुक्ताईनगरमध्ये ते पत्रकारांसोबत संवाद साधत होते.
मी अजूनही भाजपमध्ये असतो तर वाजपेयी-अडवाणींसारखी माझी अवस्था झाली असती, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षात माझ्यावर मोठा अन्याय सुरु होता. तिथल्या काही प्रवृत्तींनी जाणून बुजून मला टार्गेट केलं. सगळ्यात जास्त देवेंद्र फडणवीसांनी मला त्रास दिला, ही माझी भावना आहे. मला खेदाने सांगावंस वाटतं की मी आणखीही भाजपमध्ये असतो तर माझी अवस्था वाजपेयी-अडवाणींसारखी झाली असती, असेही खडसे म्हणाले. हा सगळा एकंदरित विचार करुनच मी पक्षांतराचा निर्णय घेतला. मी यानिमित्ताने शरद पवारांचे आभार मानतो की त्यांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्यांनी जर प्रवेश दिला नसता तर माझे राजकीय जीवन थांबले असते, असेही खडसे म्हणाले. शरद पवारांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश देऊन माझे राजकीय पुनर्वसन केले. मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत एकनाथराव खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.