कोलकत्ता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमध्ये आगामी वर्षात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवला होता. अखेर ममता बॅनर्जी यांनीही भाजपाला प्रत्युत्तर देत पश्चिम बंगालचा गुजरात होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.
भाजपा-तृणमूल काँग्रेस यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “बंगालची भूमी जीवना स्त्रोत आहे. आपल्याला ही भूमी सुरक्षित ठेवावी लागेल. आपल्याला याचा अभिमान बाळगावा लागेल. बाहेरून येणाऱ्यांनी म्हणावं की, ही भूमी गुजरातसारखीच होऊन जाईल, असं व्हायला नको. आमचा हाच संदेश आहे की, आम्ही सगळ्यांसाठीच आहोत. मानवता सगळ्यांसाठीच आहे. मग तो शीख असो, जैन असो वा ख्रिश्चन. आम्ही त्यांच्यामते फूट पाडण्याची परवानगी देणार नाही,” असं म्हणत ममतांनी भाजपावर टीका केली. “राष्ट्रगीत आणि जय हिंदचा नारा पश्चिम बंगालमधून देण्यात आला. बंगाल सर्वोकृष्टतेला महत्त्व देतो. आम्ही बंगालला गुजरातसारखं करण्याची सहमती देऊ शकत नाही,” असं त्या म्हणाल्या. अलिकडेच तृणमूल काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या सुवेंदू अधिकारी यांच्यावरही ममतांनी निशाणा साधला. “राज्यातील राजकारणात गद्दारांना कोणतंही स्थान नाही. कोटई कोणत्याही परिवाराची जहागिरी नाही. असं म्हणत त्यांनी पक्षांतर केलेल्या नेत्यांवर टीका केली.