पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील सु. भा. पाटील कॉम्प्लेक्समधील एका दुकानास रात्री अचानक आग लागली. या आगीत दुकानातील फर्निचरसह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत तब्बल १२ लाखांचे नुकसान झाले आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सु. भा. पाटील कॉम्प्लेक्समध्ये महिलांच्या साज शृंगार साहित्यांचे दुल्हन एम्पोरियम नावाचे दुकान आहे. १३ नोव्हेंबरला रात्री नेहमी प्रमाणे दुकान बंद करुन सर्वजण घरी गेले. दरम्यान, रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दुल्हन एम्पोरियम या दुकानातून धुर निघत असल्याचे तेथून जाणारे दिनेश जैन यांनी दुकानाचे चालक पिंकी राहुल जैन यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवले. त्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण दुकानास वेढा घातला. अग्निशमन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण दुकान जळुन खाक झाले होते. या आगीत जवळपास १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.
















