जळगाव (प्रतिनिधी) नशिराबाद येथील पाटचारीत पोहतांना बुडून मृत्यु पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांची राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज नशिराबाद येथे जाऊन भेट घेतली. घडलेल्या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन कुटूंबियांचे सात्वंन केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार वैशाली हिंगे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, पंचायत समिती सदस्या श्रीमती यमुनाबाई रोटे, गटशिक्षणाधिकारी श्री. चौधरी, केंद्र प्रमुख प्रकश तिडके, सरपंच विकास पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप साळी, चेतन बऱ्हाटे, चंदु भोळे, मोहन कोलते, नितीन बेंडवाल, तुषार सोनवणे, भुषण कोल्हे, किरण सोनवणे आदिंसह ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे आई, वडिल व नातेवाईक उपस्थित होते.
सोमवार (28 सप्टेंबर) रोजी दुपारी नशिराबाद गावानजीकच्या पाटचारीत विद्याथी पोहण्यासाठी गेले होते. यात मोहित शिंदे, आकाश जाधव व ओम महाजन या तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला होता. पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली व त्यांचे सात्वंन केले. तसेच या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी दहा रुपयांची वैयक्तिक मदत केली. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी शिक्षण विभागास दिले. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना शासनाच्या ज्या योजनांचा लाभ मिळू शकेल त्या योजनांचा लाभ देण्याच्याही सुचना यंत्रणेला दिल्यात.