मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना आमची आहे, याचे पुरावे कसले मागता?, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला अप्रत्यक्षपणे फटकारले आहे. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने खरी शिवसेना कोणाची?, याचा निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला पुराव्यांची कागदपत्रं सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
संजय राऊत पुढे म्हटले की, आज तुम्ही घोड्यावर बसले आहात, उद्या लोक तुमची गाढवावरून धिंड काढल्यावाचून राहणार नाही. हे माझे शब्द लक्षात ठेवा. फुटीरांनी खरी शिवसेना कोणाची, हे सिद्ध करून दाखवण्याची वेळ आणली हे दुर्दैव आहे. आपण फुटीर आहात, नव्या संसारात सुखी राहा. पण दिल्लीश्वरांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवायची आहे. त्यासाठी फुटीरांना हत्यार म्हणून वापरले जात आहे. आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आहोत.
आज आमच्यावर पुरावे सादर करण्याची वेळ आणताय. फुटीरांना या पापाची परतफेड करावी लागेल. ज्यांनी शिवसेनेवर पुरावे सादर करण्याची वेळ आणली, त्यांना आई जगदंबा माफ करणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. पैशाने आणि दहशतीने फोडलेली लोकं हा पुरावा होऊ शकत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले. निवडणूक आयोग पुरावे कसले मागते आहे?, महाराष्ट्रातील ११ कोटी जनता हाच शिवसेना आमची असल्याचा पुरावा आहे. सीमाप्रश्नाच्या आंदोलनातील हुतात्मे हा पुरावा आहे. राज्यातील शिवसैनिक हाच आमचा पुरावा आहे. विधानसभा अध्यक्षांनी फुटीर गटाला २४ तासांत शिवसेना म्हणून मान्यता दिली. हा लोकशाहीचा खून असताना कोणते पुरावे द्यायचे, असा सवाल संजय राऊत यांनी केला.