जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयित सुनील झंवर, जितेंद्र कंडारे यांच्यासह इतर आरोपी मागील १५ दिवसापासून पोलिसांना सापडत नसल्यामुळे झंवर, कंडारे पळाले कुणीकडे? याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात अनेक आमदारांनी प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितल्या नंतरही संशयित आरोपी सापडत नसल्यामुळे ‘राजकीय सेटलमेंट’ तर झाली नाही ना?, अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेचा अव्यवसाय जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला, योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यातील माहेश्वरी, सुनील झंवर, जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, योगेश साखला हे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाहीत. तर महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला, विवेक ठाकरे आणि कंडारेचा वाहन चालक कमलाकर कोळी असे एकूण पाच संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. अटकेतील संशयितांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुणे कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर सीए महावीर जैन यांनी जामीन अर्ज टाकला असून त्यावर १६ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यावर मागावर पोलीस मागील १५ दिवसापासून आहेत. दोघांसह इतर आरोपींच्या शोधार्थ राज्यभरात ३ पथके रवाना करण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी बीएचआर घोटाळ्यावर दी.१४ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या २ दिवशीय अधिवेशनात विचारणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना याबाबत सभागृहात उत्तर द्यावे लागणार, अशी स्थिती असतांना दुसरीकडे मात्र, तपास थंडावल्यागत झाला आहे. घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारच सापडत नसल्यामुळे तपास थांबला आहे. मागील काही दिवसांपूर्वी सुनील झंवर नेपाळमध्ये पळून गेल्याचे वृत्त समोर आले होते. परंतू याबाबत पोलिसांकडून काही ठोस माहिती समोर आली नाही. झंवर वगळता इतर आरोपी देखील पोलिसांना सापडलेले नाहीत. एवढ्या मोठ्या पोलीस यंत्रणेला अवघे ६ आरोपी सापडत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात. दरम्यान, आरोपी सापडत नसल्यामुळे ‘राजकीय सेटलमेंट’ तर झाली नाही?, अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपही दोन दिवसापासून बऱ्यापैकी थांबले आहेत.