जळगाव (प्रतिनिधी) दूधसंघ निवडणुकीत मुक्ताईनगर तालुका मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या आमदार मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खडसे गटाची याचिका हायकोर्टाने फेटाळली असल्याचे वृत्त समोर येत आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या विराेधात मंदाकिनी खडसे यांनी हरकत घेतली होती. या हरकतीवर शुक्रवारी सायंकाळी सुनावणी झाल्यानंतर आ.मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज कायम असल्याचा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिला होता. त्यानंतर मंदाताई खडसे ह्या हायकोर्टात गेल्या होत्या. परंतू हायकोर्टानेही आज त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. दरम्यान, मुक्ताईनगरसह एकूण सात मतदारसंघात १० उमेदवारांनी १७ उमेदवारी अर्जावर हरकती घेतल्या होत्या. यात आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांचा समावेश आहे. मुक्ताईनगर तालुका मतदारसंघातील उमेदवार मंदाकिनी खडसे यांनी त्या मतदारसंघात उमेवारी अर्ज भरणाऱ्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. त्यांच्यासह उमेदवार रमेश पाटील आणि सुभाष पाटील यांच्याविराेधात देखील त्यांनी लेखी हरकत नाेंदविली होती. जळगाव तालुका मतदारसंघातील उमेदवार खेमचंद महाजन यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात मंगेश चव्हाणांविराेधात हरकत नाेंदवली होती.
खरं म्हणजे खडसे स्वतःला एवढे मोठे नेते समजतात तर त्यांनी हायकोर्टापर्यंत जाण्याची गरज नव्हती. कोर्टाचा निर्णय हा लोकशाही बळकट करणारा आहे. खडसे यांनी आता फक्त निवडणुकीतून माघार घेऊ नये. त्यांनी निवडणुकीला समोरं जावं.
– आमदार मंगेश चव्हाण
जाणून घ्या…निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काय म्हटले होते आपल्या निकालात
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. जळगाव या संस्थेच्या निवडणूकामी जळगाव जिल्हा सर्वसाधारण मतदार संघ असून अंतिम मतदार यादी ही जळगाव जिल्हा सर्वसाधारण मतदार संघाची एकच यादी संपूर्ण जिल्हयासाठी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर यादीमध्ये तालुकानिहाय यादी प्रसिध्द करण्यात आलेली नाही. पोटनियम क्र. 14.2 प्रमाणे सामान्य सभासदांनी तालुकावार निवडलेले प्रतिनिधी द्यावयाचे आहेत असे नमूद आहे परंतु सदर प्रतिनिधी हे त्या तालुक्यातील संस्थांचे प्रतिनिधी असावेत अथवा त्या निक्यातील संस्थांचा प्रतिनिधी असावा अथवा रहिवासी असावा असे बंधनकारक असल्याचे दिसून येत नाही. सहकारी तालुक्यातील रहिवासी असावेत, असा कुठेही स्वयंस्पष्ट उल्लेख नाही. तसेच संपूर्ण पोटनियमामध्ये याबाबतचा कुठेही तपशिल नाही. यावरुन असे दिसून येते की, प्रत्येक तालुक्यासाठी एक प्रतिनिधी असावा परंतु तो त्याच तालुक्यातील संस्थाचा प्रतिनिधी किंवा रहिवाशी असावा असा कोणताही असे बंधनकारक असल्याचे दिसून येत नाही.
त्यामुळे अंतिम मतदार यादीत नाव असलेल्या कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही तालुक्यातून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास अटकाव असल्याचे दिसून येत नाही. नामनिर्देशनपत्र दाखल करणारी व्यक्ती व हरकतदार सुध्दा हे प्राथमिक सहकारी दुध संस्थेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यामुळे ती व्यक्ती त्याच तालुक्यातील रहिवासी असावी अथवा ती संस्था त्याच तालुक्यातील असावी हे म्हणणे न्यायोचित होणार नाही. त्यामुळे हरकतदारांची हरकत मान्य करुन जाब देणार यांचा न्यायोचित हक्क हिरावून घेणे योग्य होणार नाही. त्यामुळे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. जळगाव या संस्थेच्या सन 2022 2027 या पंचवार्षिक कालावधीसाठीच्या संचालक मंडळ निवडणूकीसाठी मंगेश रमेश चव्हाण, रमेश जगन्नाथ पाटील व सुभाष नानाभाऊ पाटील यांनी मुक्ताईनगर तालुका प्रतिनीधी जळगाव जिल्हा सर्वसाधारण या मतदारसंघातून दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रावर मंदाकिनी एकनाथराव खडसे व खेमचंद रामकृष्ण महाजन यांनी दाखल केलेली हरकत उपरोक्त नमूद निष्कर्षाप्रमाणे फेटाळणेत येत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांनी म्हटले होते.