भुसावळ (प्रतिनिधी) आर्टिका कार व ओमनीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत भुसावळातील नारायण नगर भागातील ३० वर्षीय तरुण जागीच ठार झाला. शिरवडे, ता. निफाड जवळ रविवारी रात्री हा अपघात घडला. या अपघातातील शहरातील दोघे जखमी झाले. या अपघातात ओमनी कारमधील नाशिक परीसरातील एक तीन वर्षीय चिमुकल्याचाही बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
शहरातील जळगाव रोडवरील नारायण नगरातील रहिवासी भुषण विठ्ठल धोटे (३०) व मित्रमंडळी आर्टिका कारने नाशिककडे जात असताना रविवारी रात्री निफाड तालुक्यातील शिरवडे गावाजवळ ओमनी व आर्टीका कारची धडक होऊन झालेल्या अपघातात भूषण धोटे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ओम कारमधील देवांग पगार या तीन वर्षीय बालकाचाही मृत्यू झाला तर ओमनी व आर्टिका गाडीतील पाच जण जखमी आहेत. या जखमींमध्ये शहरातील रहिवासी आर्टिका करमध्ये मृत भूषण सोबत असलेले स्वप्नील चौधरी व बऱ्हाटे नामक चालकही जखमी असल्याची माहिती मिळाली. या अपघातप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आले. भूषणच्या अपघाती मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत भूषणवर सोमवारी दुपारी शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ असा परीवार आहे.
















