भुसावळ (प्रतिनिधी) शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याची थाप मारत भामट्याने 75 वर्षीय वयोवृद्धेकडील एक लाख 72 हजारांचे दागिने लांबवल्याची घटना शहरातील गजबजलेल्या जवाहर डेअरीजवळ सोमवार, 13 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नसीम अब्दुल अख्तर सुभान शेख (75, मिल्लत नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बॅगेतून अलगद काढले दागिणे
तक्रारदार नसीम अब्दुल अख्तर सुभान शेख (75, मिल्लत नगर, भुसावळ) यांना सोमवारी दुपारी 12 वाजता सार्वजनिक जागी 40 ते 45 वयोगटातील तोंडाला रूमाल बांधलेल्या अज्ञात संशयिताने भेटून बोलण्यात गुंतवले विश्वास संपादन करून शासकीय योजनेचा फायदा मिळवून देतो, अशी बतावणी केली. वयोवृद्धेला शहरात चोर्या होत असल्याची सांगून त्यांच्याकडील एक लाखांच्या बांगड्या व 72 हजारांची सोन्याची चैन आरोपी त्याच्या प्रवासी बॅगेत ठेवण्यास सांगितली व ही बॅग एका कटलरी व्यावसायीकाच्या दुकानावर ठेवली व नंतर काही वेळांनी येवून बॅगेसह संशयित पसार झाला. आपली फसवणूक झाल्याची खातरजमा वयोवृद्धेची झाल्यानंतर त्यांनी तातडीने बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सत्तार शेख करीत आहेत.