भुसावळ (प्रतिनिधी ) भुसावळ तालुक्यात २ ते ३ शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी भुसावळ कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन संतोष चौधरी यांनी राज्याचे पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील तसेच मुख्य पणन अनुप कुमार यांच्याकडे केली आहे. याबाबत नुकतीच त्यांनी मंत्रालय मुंबई येथे भेट घेतली. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समिती भुसावळ येथे स्थापने पासून पहील्यांदाच समितीचे आवारात भाजीपाल्याचे लिलाव कार्यान्वित करुन त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या केलेल्या कामांची तसेच प्रस्तावित कामांची माहिती दिली. तसेच केंद्र सरकारने दि. ५ जून २०२० रोजी काढलेला कृषि अध्यादेश हा खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन देवून शेतकरी हितास मारक असल्याने या अध्यादेशाची राज्यात अंमलबजावणी करू नये अशी मागणी केली. तसेच जळगाव जिल्हयातील केळी उत्पादक शेतक-यांच्या विपणनाशी संबंधीत समस्यांबाबत व केळी पिक विम्यासंबंधी चर्चा करून या समस्या प्राथमीकतेने सोडविण्याची मागणी केली. तसेच मागील वर्षाचा अनुभव पाहता भुसावळ तालुक्यातील कापूस उत्पादक शेतक-यांच्या वतीने तालुक्यात कमीत कमी दोन ते तिन शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरु करावे अशीही मागणी यावेळी केली