अहमदाबाद (वृत्तसंस्था) मला पुरुष आवडतात पण सामाजिक दबावापोटी तुझ्याशी लग्न केले. तुला नोकरी आहे, कमावती आहेस म्हणून तुझ्याशी लग्न केले, असे वाक्य पतीच्या तोंडून ऐकल्यानंतर एका विवाहितेने थेट पोलिसात धाव घेत पतीविरुद्ध तक्रार केली आहे.
गुजरातच्या अहमदाबादपासून जवळ असलेल्या गांधीनगर येथील एका प्रतिष्ठीत संस्थेत ग्रंथपालपदी नोकरी करत असलेली ३२ वर्षांची महिला नोकरी करत असताना एका तरुणाच्या प्रेमात पडली. सप्टेंबर २०११ मध्ये लग्न झाले. वर्षभर पतीचे वागणे व्यवस्थित दिसत होते. नंतर मात्र पत्नीला पतीच्या वागण्याचा संशय आला. एकेदिवशी तिने पतीच्या मोबाइलमधील काही चॅट तपासल्यानंतर तिच्या लक्षात आले की, आपल्या पतीचे काही तरुणांशी समलैंगिक संबंध आहेत. याबाबत जाब विचारताच पतीने मला पुरुष आवडतात पण सामाजिक दबावापोटी तुझ्याशी लग्न केले असे सांगितले. तुला नोकरी आहे, कमावती आहेस म्हणून तुझ्याशी लग्न केले; असेही तो म्हणाला. हे ऐकल्यानंतर पत्नीने स्वतःला सावरले. पुढचे काही दिवस ती हळू हळू त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती परंतू पतीच्या वागणुकीत काहीच फरक पडत नसल्याचे लक्षात येताच तिने पतीविरोधात फसवणूक केल्याची तक्रार केली. लग्नाआधी समलैंगिक संबंधांविषयी माहिती दिली नाही आणि माझ्या आयुष्याचे नुकसान केले, मनस्ताप दिला अशा स्वरुपाची फसवणुकीची तक्रार पत्नीने पतीविरोधात केली. पोलिसांत जाऊ नये यासाठी पती जीवे मारण्याची धमकी देत असल्याचेही पत्नीने तक्रारीत म्हटले आहे.