मुंबई प्रतिनिधी । सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती आणि कंगना राणावत ह्या सगळ्या वादातून बाहेर पडा आणि आजूबाजूला असलेल्या गंभीर समस्यांची दखल घ्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार व ज्येष्ठ विधीज्ञ माजिद मेमन यांनी सर्व संबंधितांना केले आहे. या निमित्ताने त्यांनी केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या निर्णयावरही तोफ डागली आहे. कंगना राणावतच्या बेताल बडबडीवरून सध्या राजकारण तापलं आहे.आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. केंद्रातील सत्ताधारी भाजपचे नेते कंगनाच्या बाजूने थेट वक्तव्य करून वातावरण तापवत आहेत. मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कंगनाला वाय सेक्युरिटी देण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर माजिद मेमन यांनी ट्वीट करून चिंता व्यक्त केली आहे.
सुशांत, रिया आणि कंगना यातून बाहेर या आणि आपल्या आसपास असलेल्या अधिक गंभीर समस्यावर लक्ष द्या. या समस्यांना तोंड देणाऱ्या लोकांच्या अवस्थेकडे बघा, असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे. विमानतळांचे लिलाव सुरू आहेत. रेल्वे मार्गांचे खासगीकरण सुरू आहे, यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विमानतळं व रेल्वे विकून मोठ्या प्रमाणात बैलगाड्या खरेदी करण्याची केंद्र सरकारची योजना आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.सत्तेत असलेल्यांना देश मागे न्यायचा आहे.