पाचोरा (प्रतिनिधी) कोरोना महामारीत शिवसेनेचे पदाधिकारी, एक एक कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरुन परराज्यात जाणाऱ्यांना मदत करत होता. स्वत:ला आरोग्य दुत म्हणवणाऱ्या गिरीष महाजन यांनी जिल्हा रुग्णालयात जावुन पाहावे त्यांच्या काळात केवळ सात व्हेंन्टींलेटर होते. परंतु मी मंत्री झाल्यापासुन जिल्हा रुग्णालयात १०० व्हेंन्टींलेटर देवुन रुग्णालयाचा कायापालट झालेला जर दिसुन आला नाही तर आमदारकी व मंत्री पदाचा राजीनामा देईल, असे चॅलेंज राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गिरीष महाजन यांना दिले आहे. ते पाचोरा येथे आयोजित शिवतीर्थ मैदानाचे लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
यावेळी आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपूत, जिल्हा उपप्रमुख अॅड. अभय पाटील, गणेश पाटील, माजी नगराध्यक्षा सुनिता किशोर पाटील, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, तालुका प्रमुख शरद पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, रमेश बाफना, न. पा. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, नगरसेवक सतिष चेडे, वाल्मिक पाटील, दादाभाऊ चौधरी, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, राज्याचे महाआघाडीचे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पाचोरा – भडगाव मतदार संघात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा प्रश्न मार्गी लागला असुन मतदार संघात ५५ नविन ट्रान्सफार्मर लवकरच उपलब्ध होणार आहे. एकीकडे विरोधक म्हणता आहेत महाआघाडीचे सरकार तीन चाकांचे सरकार आहे. हे सरकार केव्हाही पडु शकते. आमचे त्यांना आवाहन आहे सरकार पाडुनच दाखवा. आम्ही दाबादाबीचे राजकारण करत नाही. यामुळे आता तुमचा पिक्चर संपला आहे. तुम्ही आमची चिंता करणे सोडून तुमच्यावरच मुक्ताईनगर सांभाळायची वेळ आली आहे. एक वर्ष पूर्ण झाले आहे. उर्वरित चार वर्षासह पाच वर्षांचा कार्यकाळ हे महाआघाडीचे पूर्ण करेल. संपूर्ण देशातुन जळगांव जिल्हा हा २२ टक्के केळी उत्पादनात अग्रेसर आहे. केंद्राने केळी वर कठोर निकष लादलेले आहेत. ते निकष पुर्वी प्रमाणेचे करण्यात यावे याकरीता येत्या दोन दिवसांत महत्त्वपूर्ण बैठकीत चर्चा करुन केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळवुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्याप्रमाणे हरियाणा राज्यात केंद्राने सी. सी. आय मार्फत कापुस खरेदी करून कापसाला भाव देत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही सी. सी. आय मार्फत शेतकऱ्यांचा कापुस खरेदी करुन त्यांना मदतीचा हात द्यावा. असेही गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की, गेल्या १० ते १५ वर्षात पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विकासाची ज्ञानगंगा आणली आहे. संपूर्ण जिल्ह्यातुन नावलौकिक व्हावा अशी विकासकामे पाचोरा शहरात सुरु आहे. कै. माजी आमदार आर.ओ. (तात्या) पाटील यांचे गेल्या चार ते पाच वर्षांपासून स्वप्न होते की, शिवतीर्थ या वास्तूचे सुशोभीकरण व्हावे. परंतु नगरपालिकेसह सर्व बाबींचा विचार करून तात्यांना दिलेला शब्द पाळला व शिवतीर्थ या मैदानाचे सुशोभीकरण करुन त्याचे लोकार्पण राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते करण्यात आले. तसेच सन – १९७६ मध्ये कै. के. एम. (बापु) पाटील यांचे संकल्पनेतुन शहरात खत कारखाना उभारला गेला होता. गेल्या ४० वर्षात कारखान्याची इमारत कमकुवत होवुन यात काम करणाऱ्या कामगारांना जिवीतहानी चा धोका होवु नये. म्हणुन शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करुन खत कारखाना इमारत व अत्याधुनिक मशिनरी करीता ८ कोटी निधी आणुन त्याचेही गुलाबराव पाटील यांचे हस्ते भुमिपुजन करण्यात आले. विरोधकांनी विकास कामांना विरोध म्हणुन रस्त्यातील खड्ड्यात झाडे लावण्याचा प्रयत्न केला. आता अशी परिस्थिती आहे की, त्यांना झाडे लावण्यासाठी शहरात कोठेही खड्डे दिसणार नाही असे सांगुन मतदार संघातील विरोधाकांचा समाचार घेतला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नाना वाघ तर आभार जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील यांनी मानले.