जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगर व परिसरातील जगलांत ताडीच्या झाडांची उपलब्धता नसतांना ताडी येते कुठून? असा प्रश्न उपस्थित करत मुक्ताईनगरात सुरु असलेले ताडीचे दुकान तत्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी जनसंग्राम बहुजन लोकमंचचे संस्थापक विवेक ठाकरे यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रासायनिक पद्धतीने तयार होऊन विक्री होणाऱ्या ताडीचे सेवन केल्याने नागरीकांना व्याधी व मृत्यू होत आहे. त्यामुळे विवेक ठाकरे यांनी ताडी विक्रीच्या दुकानावर आक्षेप घेत हे दुकान बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे केली आहे. दरम्यान, यापूर्वी जंगलात ताडीची झाडे उपलब्ध होती. ताडीच्या झाडावरून विशिष्ठ पद्धतीने व सकाळच्या प्रहरात ताडी काढून विक्री करण्याचा परवाना दिला गेला असेल. परंतू, अाता कोणत्याही भागातील जंगलात ताडीची झाडे नाहीत. तरीही मुक्ताईनगर येथे ताडी विक्रीचे दुकान कशी काय सुरू आहेत. या दुकानास राज्य उत्पादन शुल्क आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभय असल्याचा आरोप श्री. ठाकरे यांनी केला आहे.