यावल (किरण माळी) यावल तहसीलदारांच्या कॅबिनमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करीत शिवीगाळ करून टेबलवर पैसे फेकल्याच्या खळबळजनक घटनेनंतर नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी, लिपिक, शिपाई, कोतवाल इत्यादी कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून तीव्र निषेध व्यक्त करीत काम बंद आंदोलन केले. दरम्यान, याप्रकरणी पुंडलिक बाजीराव बारी या काँग्रेस पक्षकार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ३० सप्टेंबर (बुधवार) रोजी दुपारी यावल तहसील कार्यालयात कोविड–१९ विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांची एक महत्वाची आढावा बैठक सुरू होती. त्यावेळी यावल येथील काँग्रेसचे पदाधिकारी पुंडलिक बाजीराव बारी याने तहसीलदार यांच्या दालनात अनधिकृतपणे प्रवेश करून तहसीलदार साहेब यांना अरर्वाच्य भाषेत जोर-जोराने बोलून शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर तहसीलदारांच्या टेबलवर पैसे फेकण्याचा निंदनीय प्रकार केला. या घटनेचा निषेध व्यक्त करुन बारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणे कामी यावल तालुक्यातील सर्व महसूल अधिकारी,कर्मचारी यांनी आज दिनांक १ ऑक्टोंबर (गुरुवार) रोजी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले.
पुंडलिक बारी याचे विरुद्ध गुन्हा दाखल करणे कामी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर,नायब तहसीलदार आर. के.पवार,नायब तहसीलदार आर.डी.पाटील, नायब तहसीलदार मुक्तार तडवी यांच्यासह मंडळ अधिकारी,तलाठी, लिपिक,शिपाई,कोतवाल इत्यादी कर्मचाऱ्यांनी यावल पोलीस स्टेशन कार्यालयात एकत्र येऊन गुन्हा दाखल केला. नायब तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला पुंडलिक बारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल येथील पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत. या निंदनीय घटनेसंदर्भात यावल तालुक्यातील महसूल कर्मचारी जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव, तसेच प्रांताधिकारी फैजपुर भाग फैजपुर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुंडलिक बारी यांच्या विरोधात कडक कार्यवाही होणेसाठी तसेच बारी यांस तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.