भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील यावल रोडचे झालेले काम हे अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे आहे. तयार केल्यानंतर अवघ्या काही दिवसात रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करावे, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन संतोष चौधरी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ शहरातील यावल रोडचे मजबूतीकरण व डांबरीकरणचे काम फेब्रुवारी २०२० मध्ये सुरु होते. त्यावेळेस शहरातील एका सुज्ञ व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्याकडे रस्त्याच्या होत असलेल्या नित्कृष्ट कामाबाबत तक्रार केली. त्यानंतर दिनांक १६ फेब्रुवारी २०२० रोजी मी प्रत्यक्षात जाऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्यावेळेस डबर कामावर पिवळी माती पसरविण्याचे बोगस काम सुरू होते. सुरु असलेले हे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे असल्याने शहरातील काही स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी, वृत्तवाहिनी प्रतिनिधी यांच्यासमक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कुरेशी साहेब यांच्याकडे या रस्त्याच्या होत असलेल्या नित्कृष्ट कामाबाबत तक्रार केली. परंतु माझ्या तक्रारीची कोणतीही दखल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आली नाही व त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात या रस्त्यावर कुठलीही वाहतूक नव्हती. या रस्त्याचे डांबरीकरणचे काम जुलै २०२० च्या अखेरीस पूर्ण झाले. परंतु सुमारे दहा दिवसातच या रस्त्यावर भले मोठे गड्डे पडले. आज या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. या रस्त्यातील खड्ड्यांमुळे शहरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या रस्त्यावर खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात होणे नित्याचीच बाब झालेली आहे. १० दिवसातच रस्ता खराब झाल्याने या रस्त्याचे काम योग्य ती चौकशी व्हावी. यात दोषी संबंधित ठेकेदार बी. एन. अग्रवाल यांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. तसेच नगरपालिका प्रशासनातील कोणाच्या संगनमताने, दुर्लक्षाने सदरचे काम निकृष्ट दर्जाचे झाले याची देखील चौकशी होऊन संबंधित ठेकेदार व नगरपालिकेचे जबाबदार अधिकारी, पदाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.