रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा येथील चार भावंडांच्या हत्याकांडाचा तपास विशेष पथक अर्थात ‘एसआयटी’ करणार असल्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी जाहीर केले आहे.
रावेर शहरालगत अंतरावरील बोरगाव शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात चारही भावंडांची कुऱ्हाडीने वार करत निर्घुण हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर रावेरसह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या हत्याकांडामुळे जळगाव तालुक्यातील भादली येथील हत्याकांडाच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. रावेत तालुक्यात खून झालेल्यांमध्ये 13 व 6 वर्षाच्या मुलींचा तर 11 व 9 वर्षाच्या मुलांचा समावेश आहे. खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतू पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरु केली आहे. दरम्यान, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, रावेरचे निरिक्षक रामदास वाकोडे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तसेच सहाय्यक पोलीस अधिक्षक आयपीएस अधिकारी कुमार चिंथा यांच्या नेतृत्वाखालील एक विशेष तपासणी पथक अर्थात एसआयटी गठीत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी दिली. या समितीत चार पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकार्यांचा समावेश असणार आहे.