मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये शरद पवार यांच्याकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. याबाबतची माहिती खुद्द पवारांनीच दिली आहे.
२००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचे वृत्त आहे. पवार म्हणाले की, सुरुवातीला मला नोटीस आली, आता सुप्रियाला येणार आहे असल्याचे कळाले आहे, चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशातील एवढ्या सदस्यांपैकी आमच्यावर विशेष प्रेम असल्याचा मला आनंद आहे. असा टोलाही पवारांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, ‘मला काल नोटीस आली आहे. या नोटीशीत काही बाबतीत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. तसेच आपण या नोटिसला लवकरात लवकर उत्तर देऊ, असेही पवारांनी स्पष्ट केले. कारण वेळेत उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असा उल्लेखही संबंधित नोटीसमध्ये असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.