धरणगाव (प्रतिनिधी) तालुका क्रीडा संकुलाला अज्ञात शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल असे नामकरण केल्याचे फलक तडफडकी काढण्यात आल्यानंतर संतापाची लाट उसळलेली असताना सर्वपक्षीय नेते मात्र, मुग गिळून गप्प असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एवढेच नव्हे तर शहरात शेकडो बेकायदेशीर फलक लावलेली असतांना फक्त महाराजांचे नाव असलेले एकच फलक काढण्याची घाई का करण्यात आली?. तसेच शिवाजी महाराजांच्या नामकरणाचे फलक काढणाऱ्या प्रशासनाचे डोकं ठिकाणावर आहे का?, अशा संतप्त भावना धरणगावातील सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘द क्लिअर न्यूज’कडे व्यक्त केल्या आहेत.
याबाबत धरणगावातील काही सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी आपल्या संतप्त भावना ‘द क्लिअर न्यूज’कडे व्यक्त केल्या आहेत. सबंधित सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे !
शासन दरबारी पाठपुरावा करू : डी जी पाटील (काँग्रेस, प्रदेश सचिव)
खर म्हणजे छत्रपति क्रीडा संकुल या नावाला विरोध कोणाचाही नको होता. मुळात क्रीडासंकुलचे अजून कुठलेच काम झालेले नाही. ते काम लवकर व्हावे व सर्वानुमते त्या संकुलनाला शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करू. निश्चितपणे महाराजांचेच नाव क्रीडा संकुलनाला देण्यात येईल. फक्त शिवप्रेमींनी आता घाई करून कायदा हातात घेऊ नये, एवढीच अपेक्षा करतो.
फलक काढून काय साध्य केले? : दीपक वाघमारे (जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी)
अवघ्या मराठी माणसासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत. खरं म्हणजे महाराजांचे नाव दिल्यानंतर क्रीडा संकुलाची शान वाढणार होती. आपल्या गावात अनेक अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याठिकाणी कोणतीही कारवाई होत नाही. परंतू कुणाची विरोध नसतांना उलट सर्वांनी स्वागत केलेले असतांना प्रशासनाने फलक काढून काय साध्य केले?, हा मोठा प्रश्न आहे.
प्रशासनाचे डोकं ठिकाणावर आहे का? : संजय महाजन (मा.तालुकाध्यक्ष भाजप)
अवघ्या जगणे जगात छत्रपती शिवाजी महराज यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व मान्य केले, त्या महाराजांचे बॅनर मनापासून अभिनंदन तर बॅनर काढणाऱ्यांचा जाहीर निषेध. शहरात शेकडो अनाधिकृत बॅनर लावलेले असतांना फक्त शिवाजी महाराजांचे नाव आणि फोटो असलेले काढणाऱ्या प्रशासनाचे डोकं ठिकाणावर आहे का?. क्रीडा संकुलला महाराजांचे नाव देण्याबाबत कुणाचाही विरोध नसताना बॅनर काढण्याची घाई का करण्यात आली?. हिंम्मत असेल तर प्रशासनाने शहरातील वाढदिवसह इतर शुभेच्छांचे बॅनर काढून दाखवावे. या चुकीच्या कृतीबाबत लवकरच तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करणार आहोत.
शिवप्रेमी धडा शिकवल्या शियाय राहणार नाही : विनायक महाजन (सामाजिक कार्यकर्ते)
सर्व प्रथम ज्या कोणी अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे बँनर लावले, त्याचे मी अभिनंदन करतो आणि ज्या कोणी व्यक्तीने बँनर काढले, त्यांचा जाहीर निषेध करतो. धरणगाव तालुका क्रिडा संकुलला छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल नाव देण्यात यावे, यासाठी माझ्यासह तमाम शिवप्रेमीची मागणी आहे.
शिकवल्या शिवाय राहणार नाही : गोपाल पाटील (संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष)
धरणगाव क्रिडा संकुलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे फलक लावणाऱ्या व्यक्तीचे मनापासून आभार व्यक्त करतो. शिवाजी महाराजांच्या नावाच्या फलकाला कोणाचाही विरोध नव्हता. उलट धरणगावकरांकडून या नामकरणाचे स्वागतच करण्यात आले होते. परंतू नंतर प्रशासनावर राजकीय दबाव टाकून महाराजांचा फलक काढण्यास भाग पाडण्यात आला. या ठिकाणी त्या लोकांनी राजकीय भांडवल तयार करण्याच्या प्रयत्न केला. पण धरणगावकरांना हा सर्व प्रकार माहित असून या ठिकाणी धरणगावातील राजकीय भांडवलदार लोकं आहेत. त्यांना तालुक्यातील शिवप्रेमी धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.
लवकरात लवकर शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे : निलेश माळी (तालुकाध्यक्ष संत सावता माळी युवक संघ)
धरणगावातील चोपडा रस्त्यावरच्या क्रीडा संकुलाला अज्ञात शिवप्रेमींकडून बॅनर लावून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल असे नाव देण्यात आले. प्रथमता त्या अज्ञात शिवप्रेमींचे मी मनस्वी अभिनंदन करतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले अवघे आयुष्य स्वराज्यासाठी बहुजनांसाठी लोक कल्याणासाठी नावावर केले होते. अशा महापुरुषांचे नाव आपण एका साधारण क्रीडा संकुलनला देऊ शकत नाही का? प्रशासनाने व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी लवकरात लवकर विचार करून क्रीडा संकुलाला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल असे नाव देण्यात यावे अशी मागणी करतो. तसेच मी स्वतः व तमाम शिवप्रेमींच्या वतीने याला जाहीर पाठिंबा देतो.