जळगाव (प्रतिनिधी) शहरातील हरीविठ्ठल नगरातून एका शेतकऱ्याच्या घरासमोर लावलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरून नेणाऱ्या तीन आरोपींना एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. अरबाज दाऊद पिंजारी (वय-२३), जितेंद्र सुभाष पवार (वय-३६ दोघं रा. हरीविठ्ठल नगर), ईजाज खान मोहम्मद खान (वय-२६ रा. मालेगाव) असे अटक केलेल्या आरोपींचं नाव असून त्यांना पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शहरातील हरीविठ्ठल नगरातील शेतकरी संदिप सुभाष हटकर यांच्याकडे शेती कामासाठी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १८ झेड ३४३६) होते. गेल्या १५ दिवसांपासून आई आजारी असल्यामुळे त्या दवाखान्यात होत्या. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दवाखान्यातून घरी परत आल्यानंतर त्यांना घरासमोरील ट्रॅक्टर, ट्रॉली चोरीला गेल्याचे समजले. त्यानंतर संदिप हटकर यांच्या फिर्यादीवरून रामांनद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी पोहेकॉ जितेंद्र पाटील, सुधाकर आभोरे, रामकृष्ण पाटील, संजय सपकाळे, अशरफ शेख इंद्रिस पठाण यांचे पथक तयार करत आरोपींच्या शोधार्थ रवाना केले. एलसीबीच्या पथकाने अरबाज दाऊद पिंजारी (वय-२३), जितेंद्र सुभाष पवार (वय-३६) दोन्ही रा. हरीविठ्ठल नगर आणि ईजाज खान मोहम्मद खान (वय-२६) रा. मालेगाव यांना अटक केली. दरम्यान, आरोपींकडून ट्रॅक्टर,ट्रॉली जप्त करण्यात आली आहे.