नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नाना पटोले दिल्लीला आहेत. त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधींना भेटून आल्यानंतर पटोले यांना अचानक खासदार उदयनराजे भेटले. यावेळी उदयनराजे भोसले यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थाबाहेर भेट घेतली.
महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष आणि पक्षातील नेते नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर नाना पटोले काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या सदिच्छा भेटीसाठी दिल्लीला गेले होते. दिल्लीत असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे यांनी पटोले यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर भेट घेतली. या भेटीचा फोटोही समोर आला असून, त्यावरून राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोरून जात असताना उदयनराजेंना पटोले बाहेर दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेतली व उदयनराजेंनी त्यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. उदयनराजे पटोले यांना शुभेच्छा देण्यासाठी सोनिया गांधींच्या घराबाहेरच थांबले. काही मिनिटेच ही भेट झाल्यानंतर उदयनराजे पटोलेंना शुभेच्छा देऊन निघून गेले.
तर दुसरीकडे पटोले यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “काँग्रेसला बळकटी देण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. ‘जस्ट वेट अॅण्ड वॉच..’ पुढे आश्चर्यकारक धक्के देऊ,” असं सूचक वक्तव्य पटोले यांनी भेटीनंतर केलं आहे.