नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान मोदींची गाडी पंजाबमध्ये पुलावर अडकून पडल्याने हा मुद्दा चर्चेत आलाय. यापूर्वीही अशाच एका गंभीर परिस्थितीत पंतप्रधानांचे संरक्षण करणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ला गोळीबार करावा लागला. यामध्ये एकाचा जीवही गेला होता. माजी पंतप्रधान प्रवास करत असताना नेमकं काय घडलं होतं त्यादिवशी चला जाणून घेऊया.
ही घटना २५ जानेवारी २००० ची आहे. त्यांचे टार्गेट माजी पंतप्रधान चंद्रशेखर होते. घडलं असं की माजी पंतप्रधान चंद्रशेखर प्रवास करत असलेल्या रेल्वेच्या डब्यात विद्यार्थ्यांच्या एका गटाने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या संरक्षणासाठी एसपीजी तैनात होती. त्यावेळी माजी पंतप्रधानांनाही हे संरक्षण मिळत होते. आता या कायद्यात सुधारणा करण्यात आली. आता माजी पंतप्रधानांना पदावरून दूर झाल्यानंतर केवळ एक वर्षासाठी हे संरक्षण मिळते.
सआदत स्थानकावर रेल्वे थांबली होती. हे स्टेशन उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे तणाव निर्माण झाल्याने गोंधळ झाला. विद्यार्थ्यांची गर्दी अधिकच अनियंत्रित झाली. त्यानंतर एसपीजीला गोळीबार करावा लागला. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. त्यानंतर चंद्रशेखर यांचे एसपीजी संरक्षण काढून घेण्यात आले. यामुळे तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारवर टीका झाली होती.
चंद्रशेखर थोडक्यात वाचले
त्यानंतर माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यासोबत आणखी एक घटना घडली. साहिबाबाद येथे मगध एक्सप्रेसने नवी दिल्लीहून बलियाला जात असताना त्यांच्या खिडकीत मोठा आवाज झाला. हा अपघात २००३ साली झाला होता. चंद्रशेखर यांच्यावर कोणीतरी गोळी चालवली होती. जी एसी खिडकीमध्ये अडकल्याने त्यांचा जीव वाचल्याने एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांना सांगितले.