अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर बीटमधील चिमणपुरी, दहिवद, जैतपीर, गडखांब केंद्रातील मुख्याध्यापकांनी आधार कार्ड व स्वाध्यायमालात विद्यार्थ्यांची १००% नोंदणी करावी. शाळेतील एकही विद्यार्थी आधार कार्ड पासून वंचित राहणार नाही याची नोंद गांभीर्याने घ्यावी, असे गडखांब केंद्राचे केंद्रप्रमुख रवींद्र पाटील यांनी चार केंद्रातील मुख्याध्यापक आढावा बैठकीत सांगितले.
मंगरूळ येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक आढावा बैठक घेण्यात आली. व्यासपीठावर मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, चिमनपुरीचे मुख्याध्यापक राजू पाटील, देवगाव देवळी हायस्कूलचे शिक्षक ईश्वर महाजन उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, सरल प्रणाली, न्यू एन्ट्री, प्रमोशन, शाळेतील विद्यार्थी शापोआ लाभार्थी बँक खाते, खेलो इंडिया अंतर्गत रजिस्ट्रेशन करणे, शाळेतील विविध समित्या अद्यावत करणे, यासारखी ज्या शाळांची पेंडिंग कामे आहेत. त्यांनी १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करावेत. नवीन शैक्षणिक वर्षांत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे, शासनाच्या धोरणाची तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. चार केंद्राचा केंद्रप्रमुख यांचा चार्ज घेतल्यानंतर केंद्रातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक योग्य सहकार्य करतात असे सांगत हे टीम वर्क असून सर्वांनी शाळेची महत्त्वाची माहिती एका वहीत ठेवली तर माहिती देण्यास विलंब लागत नाही, असंही सांगितले. चार केंद्रातील मुख्याध्यापक सहविचार सभेत मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक सुधाकर पाटील, खेमचंद पाटील, श्रीमती भदाणे, छाया सोनवणे, भारती पाटील, हंसराज सोनवणे, सुनील सोनवणे, विकास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, देवेंद्र पाटील सह अनेक मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन खेमचंद पाटील यांनी केले.