मुंबई (वृत्तसंस्था) जवळपास गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा पालघर मनोर रस्त्यावरील वाघोबा घाटात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह (Woman deadbody) आढळून आला होता. पालघर पोलिसांनी (palghar police) खुनाचा छडा लावत तरुणीशी रिलेशनशीपमध्ये असलेला तिचा प्रियकर (२७ वर्ष) आणि त्याच्या अन्य एका साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
कॅरल मिस्किटा (वय २८)च्या कुटुंबीयांनी २५ जानेवारी रोजी स्थानिक पोलिसात ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती, मात्र पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा दावा केला जातो. म्हणून तिला न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी संध्याकाळी विलेपार्ले येथील सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्च येथून एक कँडल मार्च काढण्यात येणार आहे.
नेमकं काय घडलं?
कॅरल मिस्किटा मुंबईतील एका बीपीओ कंपनीत नोकरी करत होती. ती आपल्या ५६ वर्षीय आईसह पार्ल्यात राहत होती. २०११ पासून आरोपी झिको मिस्किटासोबत तिचे प्रेमसंबंध होते. आरोपी तिच्यापेक्षा वर्षाने लहान आहे. मध्यंतरी त्यांचे ब्रेकअप झाले होते, मात्र नंतर ते पुन्हा एकत्र आले.
२४ जानेवारी रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास कॅरल तिच्या स्कूटीवरुन बॉयफ्रेण्ड झिकोला भेटण्यासाठी निघाली. झिकोही त्याच्या स्कूटरवरून आला होता. त्याचा सहकारी कुमार देवेंद्र (वय ३०) त्याच्यासोबत होता. मध्यरात्री १२.२० च्या सुमारास कॅरलने तिच्या आईला फोन केला आणि थोड्याच वेळात आपण घरी परत येणार असल्याचे तिने आईला सांगितले.
चेहरा दगडाने ठेचला
पहाटे ३ ते ४ वाजताच्या दरम्यान पालघरमधील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कॅरल आणि झिको यांच्यात वाद झाला. त्यानंतर झिकोने कॅरलचा गळा दाबून खून केला आणि तिच्यावर चाकूने वारही केल्याचा आरोप आहे. तसेच तिचा चेहरा विद्रूप करण्यासाठी त्याने दगडाने ठेचला.
वाघोबा घाटात मृतदेह फेकला
झिको हा चाकू सोबत घेऊन गेला होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. हत्या केल्यानंतर झिको आणि त्याच्या साथीदाराने वाघोबा घाट परिसरात मुख्य रस्त्यापासून सुमारे १५ फूट अंतरावर तिचा मृतदेह फेकून दिला. त्यानंतर त्यांनी तिची स्कूटर दुसऱ्या ठिकाणी झुडपात लपवून ठेवली आणि सकाळी सहा वाजताच्या सुमारास ते मुंबईला परतले, असे पोलिसांनी सांगितले.
असा लागला शोध
कॅरल घरी परतली नाही तेव्हा तिच्या आईने दुसऱ्या दिवशी सकाळी सांताक्रूझ पोलिसांशी संपर्क साधला. सांताक्रूझ पोलिसांनी तपास सुरू केला पण तिचा शोध लागत नव्हता. १० दिवसांनंतर, ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास रस्त्याशेजारील झाडाजवळ लघुशंका करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला तिच्या कुजलेल्या मृतदेहाचा उग्र वास आला आणि त्याने पालघर पोलिसांना याविषयी माहिती दिली.
शव विच्छेदनादरम्यान छातीत आढळला चाकू
पालघर पोलिसांनी जवळपासच्या जिल्ह्यांमधील बेपत्ता व्यक्तींबाबत तक्रारींचा शोध घेतला आणि कॅरलची ओळख पटली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, तेव्हा दोघे आरोपी निश्चित झाले. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पालघर पोलिसांच्या उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) नीता पाडवी यांनी सांगितले की, “आम्ही दोघा आरोपींना अटक केली आहे आणि त्यांना न्यायालयात हजर केले असून दोघांना १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.” गुन्ह्यात वापरलेला चाकू शव विच्छेदनादरम्यान कॅरलच्या छातीत अडकल्याचे आढळून आले.