नांदेड (वृत्तसंस्था) तालुक्यातील लालवंडी येथे एका शेतातील महादेव मंदिरात आयोजित केलेल्या सामूहिक महाप्रसादातील शिरा, अंबिलमधून विषबाधा झाल्याने जवळपास ११४ भाविकांची प्रकृती बिघडल्याची घटना बुधवारी घडली. हा प्रसाद खाणाऱ्या भाविकांना मध्यरात्री ३ वाजल्यापासून उलट्या, पोटदुखी, जुलाब, मळमळ होऊ लागल्याने अनेकांनी नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यातील १२ रुग्णांना नांदेडला हलवण्यात आले असून नायगावात ८६ जणांवर उपचार सुरू आहेत. अन्य १६ जण लालवंडी येथे उपचार घेत आहेत. यातील अनेकांची प्रकृती आता स्थिर असल्याचे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
नायगावपासून जवळच असलेल्या लालवंडी येथे महादेव मंदिरात बुधवारी भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. गावातील महिला, पुरुष, लहान मुले महाप्रसाद घेण्यासाठी गेली होती. वरण-भात, शिरा, अंबिल असा महाप्रसादात बेत होता. मात्र भंडारा खाल्लेल्या नागरिकांना काही तासांनी अचानक उलट्या, पोटदुखी सुरू झाल्याने गावकरी हैराण झाले. सर्वांना त्वरित नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णसंख्या जास्त असल्याने नायगावचे ग्रामीण रुग्णालय खचाखच भरले.
डॉ. प्रशांत सोनकांबळे व त्यांची टीम रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. लहान मुले, वृद्ध महिला, पुरुषांचा बाधितांमध्ये समावेश आहे. दरम्यान, गावकरी व पुढाऱ्यांनीही बाधितांची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात मोठी गर्दी केली. मध्यरात्रीपासूनच डॉ. प्रशांत सोनकांबळे, डॉ. किशन नाईक, डॉ. सुनील वाघमारे, डॉ. श्रीमती टोम्पे, पवन मेहेत्रेसह अन्य ९ डॉक्टर व परिचारिकांनी ग्रामीण रुग्णालयात बाधितांवर उपचार सुरू केल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाल्याचे बोलले जात आहे.