चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड सुरु आहे. ११ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले असून बिनविरोध झालेली १ ग्रामपंचायतसह १२ पैकी १२ ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासह शिवसेना उबाठा गट व काँग्रेस पक्षाला आपले खातेही उघडता आले नाही.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोठ्या यशानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला व महाविकास आघाडीला पुन्हा मोठा धक्का देण्यात यश मिळाले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे माजी गटनेते शशिकांत साळुंखे यांच्या खेडगाव गावातील पॅनलचा धुव्वा उडवत भाजपा पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार उषाबाई मरसाळे विजयी झाले आहेत तर सदस्य पदांवर देखील ११ पैकी ९ उमेदवार भाजपा पुरस्कृत पॅनलचे निवडून आल्याने भाजपचे निर्विवाद वर्चस्व खेडगाव ग्रामपंचायतीवर सिद्ध झाल आहे.
खेडगाव येथील पराभूत पॅनलचे नेतृत्व करणारे शशिकांत साळुंखे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जुने नेते असून गेली अनेक वर्ष जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीत त्यांचे वर्चस्व राहिले होते. मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत त्यांच्या मुलाला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते, त्यांनतर त्यांच्या होम पिचवर ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागणारा आहे.
खेडगाव येथील भाजपा पुरस्कृत पॅनलचे नेतृत्व भाजपचे अविनाशनाना चौधरी, रावसाहेब साळुंखे, के.बी.दादा साळुंखे, पांडुरंग महाजन, सुकलाल माळी, छोटू पाटील, यांनी केले होते. विशेष म्हणजे सदर पॅनलचा प्रचार शुभारंभ आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते नारळ फोडून करण्यात आला होता. त्यामुळे खेडगाव गावातील निवडणूक हायव्होल्टेज होणार असल्याच्या चर्चा सुरुवातीपासून होत्या.