कोहिमा (वृत्तसंस्था) भारतातील ईशान्येकडील नागालँड राज्यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबारात १३ सामान्य नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही घटना नागालँडमधील मोन जिल्ह्यातील ओटिंग गावातली आहे. वृत्तानुसार, घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्या.
नेमकं काय घडलं?
मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात ही घटना घडली. काल संध्याकाळी ४ वाजताची ही घटना आहे. पीडित ग्रामस्थ एका पिक-अप ट्रकमधून घरी परतत होते. ही लोकं वेळेत घरी आली नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला असता ही घटना उघड झाली. आपल्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह पाहिल्यानंतर ग्रामस्थांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. संतप्त ग्रामस्थांनी सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्या. या घटनेत अनेक लोक जखमी झाले. दरम्यान, या गोळीबारानंतर ग्रामस्थांनी केलेल्या हिंसेमध्ये सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला आहे. एका वृत्तानुसार या गोळीबारात १३ लोक ठार झाले. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे.
या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. मोनच्या ओटिंगमध्ये झालेली हत्या अत्यंत दुर्देवी आहे. तसेच हे कृत्य तितकच निंदनीय आहे. पीडित कुटुंबाच्या प्रती माझी सहानुभूती आहे. जखमी लोक लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना करतो. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार असून न्याय देऊ. तसेच सर्वांनी शांत राहावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.