बुलढाणा (वृत्तसंस्था) साखरखेर्डा परिसरातील राताळी येथे वीज कोसळून १४ बकऱ्या जागीच ठार झाल्या. ही दुर्दैवी घटना दि. ३० एप्रिल रोजी सकाळी घडली.
सकाळी ९ वाजताच्या सुमारास राताळी येथे विजांच्या कडकडासह वादळी पावसाला सुरुवात झाली. या दरम्यान शशिकला तेजराव आव्हाळे आणि शेतमालक भिकाजी सखाराम जाधव हे दोघेही शेतात बकऱ्या चारत होते. त्याचवेळी बाजूच्या कडूलिंबाच्या झाडावर वीज कोसळली. या घटनेत झाडाजवळ चरणाऱ्या १४ बकऱ्या जागीच ठार झाल्या, तर दोन गंभीर जखमी झाल्या. यावेळी भिकाजी जाधव आणि शशिकला आव्हाळे यांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली आश्रय घेतला होता. त्यामुळे सुदैवाने ते दोघे बचावले. याबाबत माहिती मिळताच तलाठी शेळके आणि पोलिस नाईक अनिल वाघ यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक खंडागळे यांनी जखमी बकऱ्यांवर उपचार केले.