नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अनेक दिवस उलटल्यानंतर देखील हे युद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीय. या युद्धाचा परिणाम दोन्ही देशाच्या आर्थिक परिस्थीतीवरती पडला असणार हे तर सहाजिकच आहे. आता या सगळ्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, युद्धाच्या परिस्थीत रशियामध्ये कंडोमच्या विक्रीत 170 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ब्रिटनमधील एका वृत्तपत्राच्या वृत्तातून ही माहिती समोर आली आहे.
पाश्चात्य देशांच्या निर्बंधांमुळे देशातील कंडोमच्या किमतीत लक्षणीय वाढ होऊ शकते आणि इतकेच नाही तर कंडोमचा तुटवडा निर्माण होऊ शकतो असे सांगण्यात आले होते. सध्या रशियात कंडोम निर्मात्या कंपन्या जसे की Durex, Reckitt यांनी देशातील आपलं उत्पादन सुरु ठेवले आहे. रशियातील सर्वात मोठ्या ऑनलाइन प्रोडक्ट विक्रेत्या Wildberries ने म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्चच्या पहिल्या दोन महिन्यांत कंडोमच्या विक्रीत 170 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
देशातील सर्वात मोठी फार्मसी चेन असलेल्या 36.6 PJSC च्या विक्रीत 26 टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. RBC च्या अहवालानुसार केमिस्टकडून कंडोमची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचबरोबर सुपरमार्केटच्या सर्वेनुसार कंडोमच्या विक्रीत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रीझरवाटिव्हनाया सेक्स शॉपच्या सह-मालक येसेनिया शमोनिना यांनी सांगितले की, “लोक कंडोमची साठवण करुन ठेवत आहेत. त्यामुळे परिणामी आम्हाला कंडोमच्या किंमतीमध्ये वाढ करावी लागली आहे. त्यांनी सांगितले की विविध ब्रँडची उत्पादने 50 टक्क्यांनी महाग झाली आहेत. याचे कारण असे की प्रमुख पाश्चात्य चलनांच्या तुलनेत रुबल हे चलन कमकुवत झाल्यानंतर, आउटलेट्सना किमतीत वाढ करावी लागली आहे.