वाशीम (वृत्तसंस्था) शेतालगत असलेल्या धुऱ्यावरून शेत शेजाऱ्यासोबत झालेल्या वादात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल न करता अदखल पात्र गुन्हा दाखल करतो. या बदल्यात ६५ वर्षीय इसमाला २० हजारांची लाच मागणे कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत एएसआय व सहकारी कर्मचाऱ्याच्या चांगलेच अंगलट आले. याप्रकरणी वाशीम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे. तर साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवदास मंगूसिंग चव्हाण व पोलीस शिपाई नीलेश विष्णूपंत थेर अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तक्रारदार यांचे शेतालगत असलेल्या धुऱ्यावरून शेत शेजारी यांच्या सोबत भांडण झाले होते. त्यावरून तक्रारदार यांनी कारंजा पोलीस ठाणे ग्रामीण येथे दिलेल्या तक्रारीवरून अदखल पात्र गुन्हा दाखल झालेला होता. याप्रकरणात एएसआय चव्हाण याने तक्रारदार यांना तुम्ही दिलेल्या एनसी रिपोर्टवर कारवाई करतो व तुमच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीमध्ये तुमच्यावर अॅट्रॉसिटी केस व इतर कारवाई होऊ देत नाही. याकरिता २० हजार रुपयांची लाच मागणी केली. तर शिपाई थेर याने तक्रारदार यांना लाच रक्कम देण्यास प्रोत्साहीत केले.
लाचेची रक्कम देणे मान्य नसल्याने तक्रारदाराने वाशीम एसीबीकडे याबाबत तक्रार नोंदविली. प्राप्त तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने ८ मे रोजी केलेल्या पडताळणीत आरोपींनी लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या तक्रारीवरून कारंजा शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड यांच्या नेतृत्वात वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या योगेश खोटे, समाधान मोघाड, आसिफ शेख यांच्या पथकाने केली.