पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील सातगाव डांगरीच्या बस स्थानकाजवळ जुन्या वादातून मारहाण करून २२ वर्षीय तरुणाचा खून केल्याची खळबळजनक घटना १० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. पोपट ओंकार राठोड (वय २२ वर्ष, रा.सातगाव तांडा ता, पाचोरा), असे मयताचे नाव आहे.
सुरेश हसंराज तवर (वय- २२ वर्ष, धंदा- खाजगी नोकरी रा. सातगांव तांडा ता. पाचोरा), यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १० मार्च २०२४ रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास सातगांव बसस्टॅन्ड समोर पंचर दुकाना जवळ राहुल अभिमन अल्हाट हा जोरा-जोरात आरडा-ओरड करुन तू माझ्या सोबत पाच वर्षापासून दुश्मनी करतो. तू माझ्या डोक्यात खटकत आहे. तूला आज संपवुनच टाकतो. तूला आज मी जिवंत सोडणार नाही, असे बोलून मित्र पोपट राठोड यास जुन्या भांडणाच्या कारणावरुन चापटा बुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्या हातातील कड्याने दोन वेळा डोक्याला मारहाण केली. तसेच पोपट याला जमीनीवर खाली पाडून डोके धरुन दोन ते तिन वेळा जमीनीवर जोरात आपटुन ठार मारले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि प्रकाश काळे हे करीत आहेत.