फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) शहरातील भारंबे वाड्यातील मोरे कुटुंबातील नातवाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर दोन तासातच आजीने देखील या जगाचा निरोप घेतल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटे घडली. अंतिम श्वास घेणाऱ्या आजीची सर्वांशी भेट व्हावी, म्हणून इतरांना बोलवायला गेलेल्या नातवाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने मोरे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शहरातील भारंबे वाड्यातील रहिवासी तथा खिरोदा (ता. रावेर) येथील सुवर्ण व्यावसायिक विष्णू कोंडू मोरे यांच्या मातोश्री कमलाबाई कोंडू मोरे (वय ८७) यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसापासून अत्यवस्थ होती दरम्यान, मंगळवारी पहाटे कमलाबाई मोरे यांची प्रकृती अधिकच खालावली. या वेळी कमलबाई मोरे यांचे येथील लक्कड पेठेत राहणारे चिरंजीव डी. के. मोरे व सर्व कुटुंब हजर होते. तर वैभव उर्फ विक्की मोरे (सोनार) हा आजीची भेट सर्वांशी व्हावी, या उद्देशाने बाहेर गेला. मात्र, अचानक त्याला हृदयविकराचा तीव्र झटका आल्याने जागीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना पहाटे ४ वाजता घडली.
या दुर्दैवी घटनेमुळे मोरे कुटुंबावर मोठे संकट कोसळले. तर दोन तासानंतर कमलाबाई मोरे यांचे ही निधन झाले. या दुहेरी संकटामुळे मोरे कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. २१ वर्षीय विक्की मोरे याचे निधन झाल्याने मोरे कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून यामुळे गावात शोककळा पसरली होती. या वेळी शहरातील सुवर्ण व्यावसायिक बांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. या दोघांच्या अकाली निधनाने मोरे (सोनार) कुटुंबावर संकट ओढवले आहे. अंत्ययात्रा मंगळवारी दुपारी ३ वाजता आजी आणि नातू अशा दोघांची सोबतच अंत्ययात्रा निघाली, त्यामुळे संपूर्ण शहरात दुःखाचे वातावरण होते. या वेळी सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते. या दोघांवर बाहेर पेठ स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.