नारायणपूर (वृत्तसंस्था) छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलांनी चकमकीत २८ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. ३० नक्षलवादी ठार झाल्याचेही वृत्त आहे. रात्री उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. नक्षलवादविरोधी मोहिमेतील अलीकडच्या काळातील हे मोठे यश आहे.
बस्तर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील अबूझमाडच्या थुलथुली गावालगतच्या जंगलात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त तुकडीला मोहिमेवर पाठवण्यात आले होते. या तुकडीत जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) आणि विशेष कार्य दलाचे (एसटीएफ) जवान होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला.
जवानांनीदेखील चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत २८ नक्षलवादी ठार झाले असून घटनास्थळावरून एके-४७ आणि एसएलआर रायफल्स व इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती. यापूर्वी गुरुवारी सुरक्षा दलांनी सुकमा जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचे एक शिबीर उद्ध्वस्त करून मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त केला होता. सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर क्षेत्रात चालू वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलांनी १८५ नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले.