मुंबई (वृत्तसंस्था) जगभरातील २ कोटी ९० लाख महिला या आधुनिक काळातील गुलामगिरीच्या शिकार बनल्या आहेत, असे संयुक्त राष्ट्राच्या अलिकडच्या एका अहवालात म्हटले आहे. जबरदस्तीने केले गेलेले विवाह, काबाड कष्ट, कर्जबाजारीपणामुळे करावी लागणारी मोलमजुरी आणि कौटुंबिक गुलामगिरीसारख्या जाचक वागणूकीला महिला आणि मुलींना सामोरे जावे लगते.
याचाच अर्थ प्रत्येक १३० महिला आणि मुलींमागे एकीला आधुनिक गुलामगिरीमध्ये रहावे लागते आहे. या गुलामगिरीतील स्त्रियांची एकूण संख्या ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे, असे “वॉक फ्री’ या गुलामगिरीविरोधी संघटनेचे सहसंस्थापक ग्रेस फॉरेस्ट यांनी म्हटले आहे. मानवाच्या इतिहासात यापूर्वी गुलामगिरीत जेवढे लोक होते, त्यापेक्षाही अधिक लोक आजच्या घडीला आधुनिक गुलामगिरीमध्ये रहात आहेत, ही वस्तुस्थिती आहे, असेही फॉरेस्ट यांनी संयुक्त राष्ट्राचा पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. आधुनिक गुलामगिरी म्हणजे आर्थिक लाभासाठी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेणे होय, असे “वॉक फ्री’ने म्हटले आहे. आधुनिक गुलामगिरीमधील ९९टक्के पीडीत महिलांना लैंगिक आत्याचारांना सामोरे जावे लागते. ८४ टक्के पीडीत महिलांचा बळजबरीने विवाह होतो आणि ५८टक्के पीडीत महिलांना बळजबरीने मजूरी करावी लागते. करोनाच्या साथीमुळे जगभर निर्माण झालेल्या परिस्थितीत महिला आणि बालकांच्या बळजबरीने विवाहांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. अशा विवाहांना कायद्याने बंदी घालण्यासाठी “वॉक फ्री’प्रयत्नशील आहे. अद्याप 136 देशांमध्ये अशा विवाहांना कायद्याने बंदी घातली गेलेली नाही.
















