जळगाव (प्रतिनिधी) नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प टप्पा- 1 च्या यशस्वीतेमुळे नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प टप्पा- 2 राबविण्यास कृषी व पद्युम विभागाच्या शासन निर्णय क्र. नादेकृ 4622/प्र.क्र.94/8-अे/मंत्रालय/मुंबई, दि.14 ऑक्टोबर 2024 अन्वये महाराष्ट्र शासनाची तत्वत: मान्यता देण्यात आलेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या टप्पा- 2 ची अंमलबजावणी विहित वेळेत व सुरळीत व्हावी या दृष्टीकोनातून प्रकल्पाच्या टप्पा- 2 करीता गाव निवड समितीने निवड केलेल्या गावांच्या यादीस मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील एकूण 319 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होवून जिल्ह्यातील उर्वरित गावातील शेतकऱ्यांना एक नवी आशा मिळाली आहे.
नानाजी देशमुख कृषी संजिवनी म्हणजे पोकरा प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ४६० गावांचा समावेश होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने ४६० गावांमध्ये ८६ हजार ६१६ शेतकरी बांधवांना ६४५ कोटी ९३ लक्ष इतक्या रकमेचे अनुदान मंजूर करून वितरीत केले आले आहे. जिल्ह्यातील ५० शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनींच्या कृषी व्यवसाय प्रस्तावांना अनुदान वितरीत केले आहे. आता टप्पा – २ मध्ये नव्याने ३१९ गावांचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना ही शासनाची दिवाळी भेट मानली जात आहे.
जिल्ह्यात ३१९ गावांचा समावेश !
जळगाव – १६ ,धरणगाव – २०,अमळनेर – ३६ , भुसावळ – १२, भडगाव – १०, बोदवड – ११ , जामनेर – ३५, रावेर – ३१, यावल – १८, चोपडा – २३, पाचोरा -३४, मुक्ताईनगर – १३, पारोळा – २१, एरंडोल – १२ व चाळीसगाव – २७, अश्या ३१९ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
जळगाव ग्रामीण मधील समावेश झालेल्या गावांची यादी !
धरणगाव तालुक्यातील नांदेड, नारणे, खर्दे बु., बाभुळगाव, अहिरे बु., अहिरे खु., सोनवद खु., सतखेडे, पिंपळेसिम, वाघळूद बु., चावलखेडे, भोद खु., कल्याणे बु., कल्याण होळ, हिंगणे खु., बांभोरी बु. , बोरगाव बु., विवरे, भवरखेडा, बोरगाव खु. तर जळगाव तालुक्यातील धानोरा बु., नागझिरी, शिरसोली प्र. बो., शिरसोली प्र.न., दापोरा, लमानंजन, कुऱ्हाडदे, वाकडी, म्हसावद, बोरनार, पाथरी, डोमगाव, वडली, जवखेडा, लोणवाडी बु. व लोणवाडी खु. या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वीतेमुळे राज्यात टप्पा – 2 मध्ये उर्वरित गावांचा समावेश व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी च्या बैठकीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा -2 साठीच्या गाव निवड समितीने प्रकल्पाच्या टप्पा – 2 मध्ये समाविष्ट करावयाच्या गावांसाठीचे निकष निर्धारित करून त्यानुसार गावांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करून शासनाने जिल्ह्यात 319 गावांचा या योजनेत समावेश केला असून त्यात जळगाव ग्रामीण मधील ३६ गावांची निवड करण्यात आली आहे.