अलीगड (उत्तर प्रदेश) दिल्ली गेट परिसरातील खेळण्यांच्या एका कारखान्यात झालेल्या स्फोटात मरण पावणाऱ्यांची संख्या ४ झाली आहे. या स्फोटात किमान डझनभर लोक जखमी झाले आहेत. काल झालेला हा स्फोट गॅस सिलिंडरमुळे झाला होता.
या स्फोटामुळे आजूबाजूच्या किमान अर्धा डझन घरांचीही पडझड झाली होती. दिल्ली गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेली ही घटना खातिकान परिसरात घडली होती. या स्फोटात मरण पावलेल्या चौघांमध्ये मनोज आणि विशाल उर्फ विकी अशा दोघा भावांचाही समावेश आहे. प्लॅस्टिकची खेळणी बनवण्याची ही फॅक्टरी याच दोघा भावांच्या मालकीची होती. या फॅक्टरीमध्ये गेल्या 50 वर्षांपासून खेळण्यातील बंदुका बनवल्या जात होत्या आणि या दोन भावांचे काका सुरिंदर भिलवारे यांच्या मालकीच्या जागेवर ही फॅक्टरी सुरू होती, असे पोलिसांनी सांगितले.
या स्फोटाचे स्वरुप पाहता वेगवेगळ्या विभागांच्या तज्ञांच्या पथकाकडोन तपास केला जाईल, असे जिल्हा दंडाधिकारी चंद्र भुषण सिंह यांनी पत्रकारांना सांगितले. आगामी सणांच्या पार्श्वभुमीवर या ठिकाणी फटाके अणि अन्य स्फोटकांचा बेकायदेशीर साठा करून ठेवला होता का हे तपासले जाणर आहे.