जळगाव (प्रतिनिधी) जळगावातील नवीन बसस्थानकात २० जानेवारी रोजी एक चोरीचा प्रकार घडला, ज्यात दीपिका अजयकुमार तिवारी (वय ३२, रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्या पर्समधून ४० ग्रॅम वजनाचे ९५,६०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी २१ जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपिका तिवारी दि. १३ जानेवारी रोजी भावाच्या मुलाच्या लग्नासाठी जळगाव आल्या होत्या. लग्न सोहळा आटोपल्यानंतर त्या २० जानेवारी रोजी सिल्लोडकडे परत जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर पोहोचल्या. गर्दीमुळे त्या जळगाव-वैजापूर बसमध्ये चढताना त्यांच्या नणंदेने त्यांना सांगितले की, त्यांच्या पर्सची चैन उघडी आहे. पर्स तपासल्यावर त्यातून हॅण्ड पर्स गायब असल्याचे दिसून आले.
गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दीपिका तिवारी यांच्या हॅण्ड पर्समधून तीन तोळ्याचे सोनपोत, तीन सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येकी तीन ग्रॅम वजनाच्या) आणि दोन भार चांदीचे पैंजन असा ९५,६०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. दीपिका तिवारी आणि त्यांच्या नणंदेने बस आणि स्थानक परिसरात पर्स शोधली, पण ती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी २१ जानेवारी रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी बसस्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यात दोन ते तीन महिला संशयास्पदपणे गर्दीत फिरताना दिसत आहेत. पोलिसांनी ते फुटेज ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोहेकों अलका शिंदे करत आहेत.