नाशिक (प्रतिनिधी) नाशिक विभागात कोविड १९च्या प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया पुणे या कंपनीची ‘कोविडशिल्ड’ नावाची लस उपलब्ध करुन दिली असून, विभागाला एकूण १ लाख ३१ हजार ८९० डोसेजचा पुरवठा करण्यात आला आहे. आज नाशिक विभागातील एकूण ४० लसीकरण केंद्राद्वारे चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार असल्याची माहिती, आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी दिली आहे.
कोरोनाच्या प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्याला कोरोनाची लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नाशिक विभागात उद्यापासून कोविड लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येकजिल्ह्यात यापुर्वी कोविड लसीकरणाबाबतची रंगीत तालीम घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक जिलह्यात लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविली जाईल. यासाठी लसीकरण केंद्रावर नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आली असल्याची माहिती, डॉ. गांडाळ यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात उद्या होणार तेराशे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण
जिल्ह्यासाठी ४३ हजार ४४० डोसेजेस प्राप्त झाले आहेत. कोरोनाच्या लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालय नाशिक, सामान्य रुग्णालय मालेगाव, उपजिल्हा रुग्णालय कळवण, उपजिल्हा रुग्णालय निफाड, उपजिल्हा रुग्णालय चांदवड, ग्रामीण रुग्णालय येवला, इंदिरा गांधी हॉस्पिटल नाशिक, शहरी आरोग्य केंद्र नवीन बिटको नाशिक, शहरी आरोग्य केंद्र जे. डी. सी बिटको नाशिक, शहरी आरोग्य केंद्र कॅम्प वॉर्ड मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र निमा १ मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र रमजानपुरा मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र सोयगाव, मालेगाव अशा महानगरपालिका व ग्रामीण भाग मिळुन जिल्ह्यात एकूण १३ लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जाणार असून दिवसाला तेराशे जणांचे लसीकरण केले जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात उद्या होणार बाराशे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण
अहमदनगर जिल्ह्यासाठी एकूण ३९ हजार २९० डोसेजेसचा पुरवठा करण्यात आला असून लसीकरणासाठी १२ केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालय अहमदनगर, उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, ग्रामीण रुग्णालय शेवगांव, ग्रामीण रुग्णालय श्रीरामपुर, ग्रामीण रुग्णालय राहता, ग्रामीण रुग्णालय संगमनेर, अकोले ग्रामीण रुग्णालय,तोफखाना रुग्णालय, जिजामाता आरोग्य केंद्र, आरोग्य केंद्र नागापुर, आरोगय केंद्र केडगांव अशा एकूण १२ केंद्रावर आज बाराशे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.
धुळे जिल्ह्यात उद्या होणार चारशे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण
धुळे जिल्ह्यासाठी एकूण १२ हजार ४३० डोसेजेसचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच धुळे जिल्ह्यासाठी एकूण ४ केंद्र निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय धुळे, उपजिल्हा रुग्णालय शिरपूर, ग्रामीण रुग्णालय साक्री, महानगरपालिकेचे प्रभातनगरातील आरोग्य केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर दिवसाला शंभर असे चारही केंद्र मिळून दिवसाला चारशे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात उद्या होणार सातशे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण
जळगाव जिल्ह्यासाठी एकूण १२ हजार ३२० डोसेजेचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच लसीकरणासाठी एकूण ७ केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. आज सात केंद्रावर एकूण सातशे जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. रुग्णालय जळगाव, भिकमचंद जैन रुग्णालय शिवाजीनगर जळगाव, उपजिल्हा रुग्णालय जामनेर, उपजिल्हा रुग्णालय चोपडा, ग्रामीण रुग्णालय चाळीसगांव, भुसावळ एमडी, कॉटेज हॉस्पिटल पारोळा ही लसीकरणाची सात ठिकाणे आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात उद्या होणार ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण
नंदुरबार जिल्ह्यासाठी एकूण १२ हजार ४१० डासेजेचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय, अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय, म्हसावद ग्रामीण रुग्णालय तसेच नवापूर उप जिल्हा रुग्णालय अशा चार ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.आज चार केंद्रावर एकूण चारशे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत शासकीय व खाजगी ११,८६० आरोग्य अधिकारी- कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली असून दररोज एका केंद्रावर १०० व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. आजपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे.