मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. सध्या राज्यातील एकूण ४० हजार शिक्षकांची पदं रिक्त असून ही पदं भरण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात होणार आहे.
शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन गेल्या दोन वर्षांत झाले नव्हते. सन २०१८-१९ नंतर आता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देत असतात. परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. याआधी २०१८-१९मध्ये शेवटची परीक्षा घेण्यात आली होती. १ ली ते ४ थी आणि ५ वी ते ८ वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य असणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार अशी ४० हजार शिक्षकांची पदं रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे.