पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात मॉलचा स्लॅब कोसळून ५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर ५ कामगार जखमी झाले आहेत. पाच कामगारांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दुजोरा दिलाय.
या घटनेबाबत राहुल श्रीरामे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम सुरु असणाऱ्या ठिकाणी ही दुर्घटना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. स्लॅबसाठी लोखंडाच्या सळ्यांची तयार केलेली जाळी कोसळून त्याखाली १० कामगार अडकले. यापैकी पाच जणांना बाहेर काढण्यात आलं. तर पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला.
पुण्याचे महापौर मुलीधर मोहोळ यांनी रात्री साडेबाराच्या सुमारास ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. “येरवडा येथील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगल्याजवळ इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅबची जाळी कोसळून काही लोक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून आपल्या पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे,” असं महापौर ट्विटमध्ये म्हणाले.
















