नवी दिल्ली वृत्तसंस्था । संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून (१४ सप्टेंबर) सुरुवात होत आहे. या अधिवेशनावर कोरोनाचं सावट आहे. लोकसभेच्या ५ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन महिला खासदारांचा समावेश आहे. सध्या अनेक खासदारांची कोरोना चाचणी सुरू आहे.
कोरोना संकट असल्यानं यंदाच्या अधिवेशनात संसदेत बऱ्याच वेगळ्या गोष्टी दिसणार आहेत. अधिवेशनादरम्यान नियमावलीचं पालन करण्यात येईल. लोकसभेचं कामकाज दररोज ४ तास चालेल. त्यामुळे शून्य प्रहराचा कालावधीदेखील अर्ध्या तासावर आणण्यात आला आहे. याशिवाय प्रश्नांना लिखित स्वरुपात उत्तरं मिळतील. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. ‘या संकट काळात आपण सगळे एक आहोत. आता वेळ घटनात्मक जबाबदारी पूर्ण करण्याची आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी सर्व सदस्यांना त्यांची कोरोना चाचणी करायची आहे. खासदार डिजिटल पद्धतीनं त्यांची उपस्थिती नोंदवू शकतात. यंदा संसदेत डिजिटल कामकाज होईल. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत सॅनिटायझेशनदेखील करण्यात येईल,’ अशी माहिती बिर्ला यांनी दिली होती.