चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयास डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलाजी (डी एस टी), न्यू दिल्ली या संस्थेद्वारे, ५८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहेत.
अनुदान हे महाविद्यालयातील सायन्स अँड टेक्नॉलजी विभागातील विविध संशोधन उपकरण खरेदी करण्यासाठी तसेच स्वतंत्र अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी प्राप्त झाल्याची अध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी दिली. यावेळी प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी,प्रोजेक्ट समन्वयक डॉ. एस. आर. पाटील व प्रा. मयूर पाटील हे पाटील, डॉ. शैलेश वाघ, डॉ. एल. बी.पटले, डॉ. व्ही आर हुसे, डॉ. पी. एन. सौदागार उपस्थित होते.
माहिती देताना प्राचार्य डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, अनुदान मिळविण्यासाठी संपूर्ण भारतातून उच्च श्रेणी व नामांकित विद्यापीठ तसेच महाविद्यालयांकडून ऑनलाइन अर्ज मागविले जातात. त्यांची छाननी होऊन त्यापैकी काही निवडक महाविद्यालयांना मुलाखतीसाठी बोलविले जाते. मुलाखतीनंतर निकष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांना अनुदान दिले जाते. त्यानुसार ह्या वर्षी संपूर्ण भारतातून १२०० विद्यापीठ तसेच महाविद्यालयांनी अर्ज केले होते, त्या पैकी ५५ महाविद्यालयांना कालीकत विद्यापीठ केरळ येथे ३१ ऑक्टोंबर रोजी मुलाखतीसाठी बोलविले होते.प्रोजेक्टकचे सादरीकरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी व प्रोजेक्टचे समन्वयक डॉ. एस. आर. पाटील यांनी केले.
सादरीकरणास महाराष्ट्रातून एकूण पाच महाविद्यालये उपस्थित होते, महाराष्ट्रातून दोन महाविद्यालयांना अनुदान प्राप्त झाले. अनुदान मिळविण्यासाठी प्रामुख्याने महाविद्यालयातील गेल्या पाच वर्षातील उच्च प्रतीचे शोधनिबंध, महाविद्यालयातील संशोधन मार्गदर्शक व त्यांच्या मार्गदर्शना खालील संशोधक विद्यार्थी संख्या, महाविद्यालायतील गेल्या पाच वर्षातील पी एच डी प्राप्त संशोधक विद्यार्थी संख्या याचा विचार केला आहे.
अनुदान प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालयास स्वतंत्र अत्याधुनिक प्रयोगशाळा तयार करता येईल. त्यामुळे विद्यापीठ परीक्षेत्रातील उच्च शिक्षणातील संशोधनास चालना मिळेल. तसेच संशोधनाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. तसेच अत्याधुनिक संशोधन उपकरणामुळे ग्रामीण भागातील गरीब संशोधक विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात संशोधन सुविधा उपलब्ध होतील. तसेच त्यांच्या संशोधन नमुन्याची चाचणी करता येईल. सदर प्रोजेक्ट तयार करण्यासाठी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले. व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील व सचिव स्मिता संदीप पाटील, यांचे मार्गदर्शन लाभले.