मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकार आणि विरोधी पक्षात रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून शाब्दिक युद्ध सुरु आहे. त्यातच आता आणखी एकदा विरोधकांनी सरकारला टोला लगावला आहे. सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे पंतप्रधांनांना पत्र लिहतील असा टोमणा चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्र सरकारनं कायदा केल्यास मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. राज्याच्या या भूमिकेचाही त्यांनी समाचार घेतला. ‘जनता मूर्ख आहे असं महाविकास आघाडी सरकारला वाटतं. राज्यात गेल्या दीड वर्षापासून मागास आयोगच अस्तित्वात नाही. केंद्र सरकारचा त्याच्याशी काहीएक संबंध नाही,’ असं पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी आहे, असं विधान भाजपचे राज्यसभेतील खासदार संभाजीराजे भोसले यांनी केलं होतं. त्यावरही पाटील यांनी भाष्य केलं. ‘संभाजीराजेंनी राजीनामा दिल्यामुळं नेमकं काय साध्य होणार आहे हे मला कळत नाही. त्यांच्या राजीनाम्यानं कुणावर परिणाम होणार आहे. हे कोडगं सरकार आहे,’ असं ते म्हणाले. संभाजीराजे यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचीही सध्या चर्चा आहे. त्याचा पाटील यांनी निषेध केला.